आफ्रिकन सफारी

आजच्या फूल टू पावसाळी राईड ला काय नाव द्यायचे तेच समजत नव्हते …अनेक नावे सुचत होती पण नक्की होत नव्हती.. राईड संपता संपता ट्राफिक जॅम मध्ये झालेल्या एका किश्याने तो प्रश्ण सोडवला .. तो किस्सा राईड च्या शेवटी…

२०१७ च्या पावसाळ्यात अंबरनाथच्या आसपास करत असलेल्या राईड्स च्या वेळीच,पूढील वर्षी खेड ला असणार तेव्हा कोणते रस्ते खास पावसाळी राईड साठी राखून ठेवायचे, याचा विचार सुरु असे .
आज अशा खास राखून ठेवलेल्या रस्त्यावरुन तेही अस्सल कोकणी आषाढ पागोळी पावसात राईड ची संधी लाभली.
निघालो तेव्हापासूनच धुंवाधार पाऊस पडत होता.आजचा मार्ग होता, “जगबुडी” असे अजब नाव असलेल्या नदीच्या किनाऱ्याने जाणारा रस्ता. आज जगबुडी तिचे नाव सार्थ करण्याच्या पवित्र्यात होती. थोडं विषयांतर करतोय, हे अजब नाव या नदीला का मिळालं असेल याचा कायम विचार करत आलोय.

खरतर या अफाट विश्वाच्या पसाऱ्यामध्ये ही तर एक छोटीशी नदी. पण आज तिच्या किनाऱ्याने जाताना जी गावं दिसली, अनुभवली तेव्हा असे वाटू लागले कि ज्या कुणी हे नाव तिला ठेवले त्याचे जग इतकेच मर्यादित परंतू परिपूर्ण असावे.परिपूर्ण अशासाठी म्हणतोय कि दळणवळणाच्या साधनांचा सुळसुळाट होण्याच्या कित्येक वर्षे आधी इथे वस्ती होती व आजही अगदी मर्यादित संपर्क शहराशी ठेऊन, इथल्या गावांत लोकं राहताहेत.

आज ही दुर्गम वाटावीत अशी गावे आहेत तिच्या किनाऱ्याला. तालुक्याच्या गावाला यायचे तर ५५ रुपये तिकिट आहे एस टी चे ..कोकण रेल्वे च्या पॅसेंजरचे तिकिट खेड ते ठाणे ही ६५ रुपयेच आहे ..

नावं तरी काय या गावांची ..
सुसेरी, कोंढे, कर्जी, मुंबके, बहिरवली, पन्हाळजे, भडवळे … यातलं मुंबके अनेकाना माहीत असेल कारण ते दाउद इब्राहिम चे गाव आहे…. असो, तो आपल्या लेखाचा विषय नाही …

STStop
कर्जी गावातल्या एका प्रवासी निवाऱ्यात थांबलो तेव्हा पाऊस फूल फॉर्म मध्ये होता. थोडी पोटपूजा करुन व प्रवासी निवाऱ्यात थांबलेल्या विद्यार्थी वर्गाशी थोडा वार्तालाप करुन पुढे निघालो.

हा रस्ता म्हणजे ,रस्ते कसे नसावेत याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. अचानक चढ, अचानक उतार, वळण व पुन्हा चढ .. सतत कोसळणारा पाऊस व डांबरट का होइना पण डांबरी रस्ता या दोन जमेच्या बाजू व डाव्याबाजुला तुडुंब भरलेली जगबुडी यांच्या सानिध्यात आमचा सायकल प्रवास मस्त सुरु होता.

रेल्वेचा भोंगा ऐकू आला, अरे इथे कूठे आली रेल्वे असा प्रश्ण पडतोय इतक्यात लक्षात आले , रस्ता ,दरी , नदी परत दरी असे डावीकडे जात राहिलो तर नंतर कोकण रेल्वे मार्ग येतो ..

म्हणजे “तुंबाड ” जवळ आलय ..

तुंबाडच्या पलिकडे “आयनी” म्हणजेच रेल्वेच्या परिभाषेत अंजणी हे स्थानक अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे ..
“तुंबाडचे खोत” या महा कादंबरीमुळे अवघ्या महाराष्ट्रातील साहीत्यप्रेमीना माहीत झालेले गाव म्हणजे तुंबाड.मग राहूल व मी त्या महा कांदबरीतले किस्से आठवत एक मोठी चढण पार केली … इथे खरतंर फोटो साठी छान जागा होती ,पण पावसामुळे फोटोचा मोह आवरला व चढाई पार केली .

Vadapav.jpg
आता भूक लागली होती व नाष्टा कुठे मिळेल याचा विचार राहूल व मी दोघेही करत होतो, इतक्यात तुंबाड मधील एक दुकान दिसले व वडापाव मिळेल असा फलक ही दिसला.

एकमेकांना न विचारताच सायकली तिकडे वळल्या. आम्ही पोहोचलो त्याच्या एखादे मिनिट आधी ताजे पाव घेऊन पाववाला आला होता. मस्त गरम ताजा वडापाव मिळाला.

kakaphone
एक दोन फोन आले होते नातेवाईक मंडळींचे, त्याना ही प्रतिसाद दिला.

 

निर्मनुष्य रस्ता, जंगल, हिरव्या रंगाच्या अनेक छ्टा न्याहाळत चढ उतार पार करत होतो. इतक्यात लक्ष गेले एका जल प्रपाताकडे. पूर्ण मस्तीत कोसळत होता.. मग पावसाची पर्वा न करता छान फोटो सेशन केले. बहीरवली असे लांबलचक नाव असलेले गांव आले .

 

tumbadcycle
पूर्ण बहरलेल्या अनंतासमोर सायकलींचे फोटो काढुन निघालो.

निर्मनुष्य रस्ता, जंगल, हिरव्या रंगाच्या अनेक छ्टा न्याहाळत चढ उतार पार करत होतो. इतक्यात लक्ष गेले एका जल प्रपाताकडे. पूर्ण मस्तीत कोसळत होता.. मग पावसाची पर्वा न करता छान फोटो सेशन केले. बहीरवली असे लांबलचक नाव असलेले गांव आले .


“खैसुन आयलात सायकल वरुन” अशा अस्सल कोकणी मुसलमानी बोलीभाषेतील प्रष्णाला खेऱ्याsहुन आयलोय खेरचेच हाउत असे उत्तर अनाहुत पणे तोंडातुन बाहेर परले. (पडले )
बोलीभाषेची चेष्टा करण्यापेक्षा तीची सौंदर्यस्थळे शोधली तर भेदाभेदाच्या अनेक समस्या सहज सुटतील असा एक विचार मनात आला ..
कैक वर्षानी ही बोलीभाषा उमटली जीभेतुन,आपोआप, म्हणून स्वतःवरच खूष झालो .

पन्हाळजे नावाचे गांव आले. एका बंद घराच्या पडवीत दोन तीन गांवकरी उभे होते . थांबलो .
इथून परत फिरायचे कि वेगळा मार्ग बघायचा यावर चर्चा केली …
“पूढचा रस्ता चांगला आहे, थोडा चढ पार केलात की वाकवली पर्यंत जाल सहज” असा सल्ला वजा आदेश दिला गावकऱ्यांनी.

इथपर्यंत येताना जे काही उतार लागले होते, भोगले होते, ते आता दाम दुप्पट वसुली करतील, त्यापेक्षा सरळ पूढेच जाउया असा सुज्ञ विचार करुन पूढे निघालो.पन्हाळजे च्या वेशीवर एक दुकान दिसले पडवी असलेले,थांबलो, थोडी पोटपूजा केली, दुकानदारालाही थोडा खाउ दिला.

मागच्या राईड च्या अनुभवाने आज पाठपिशव्या खाउ ने भरुनच निघालो होतो व तुंबाड ला अनपेक्षितपणे मिळालेल्या वडापावामूळे बेगमी होती खाउ ची शील्लक.दुकानात वीजेची सोय नाही, कारण विचारले तर जवळ वीजेचा खांब नाही म्हणून मंडळ वीज देत नाही. इथल्या गावांच्या दुर्गमतेची कल्पना यावी या साठी हा उल्लेख केलाय.

एका भल्यामोठ्या चढावर मध्येच एका वाकणात थांबलो, डाव्याबाजुला लावणी आधीची नांगरणी सुरु होती, आवण ही तयार होते (आवण = भाताच्या रोपांच्या जूड्या )
पोटरी बुडेल इतक्या चिखलांत दोन बैलांचे ८ व नांगऱ्याचे दोन २ असे पाय जेव्हा बुडत होते व बाहेर येत होते तेव्हा एक वेगळाच ध्वनी होत होता ..
(आर. डी. ने ऐकला असता तर नक्कीच वापरला असता कूठेतरी चपखल पणे )
तो नाद कानांत साठवुन ठेवत पूढे निघालो. चढाई संपली व भडवळे गाव आले, मग दमामे, कात्रण अशी गावे आली. चढाईतच जगबुडीचे सानीध्य संपले होते.

कात्रण च्या तीठ्यावर थांबुन राहूल ची वाट पहात बसलो. कारण दोन पैकी कोणता रस्ता निवडायचा हे त्यालाच ठाउक होते. राहूल आलाच दोन तीन मिनीटात. अचानक समोर येणाऱ्या चढांचा  अंदाज न आल्याने त्याच्या सायकलची चेन नीसटत होती अधुन मधून .. मला व यश ला आता सवय झाल्ये अशा प्रकारच्या खास कोकणी चढ उतारांची. मूळातले बैल गाडीचे रस्ते आहेत हे, आता डांबरी झालेत एव्हढेच, बाकी रस्ता बांधणीच्या शास्त्रापासुन हे रस्ते अजुन खूप दूर आहेत. कात्रणला पाच सायकलस्वार विद्यार्थी भेटले. त्यानी कोणता रस्ता चांगला आहे त्याची माहीती दिली, अर्थात राहुलला माहिती होतीच त्याला दुजोरा मिळाला .

katrankids

जर सर्व सुरळीत झाले तर आता थोडेच अंतर बाकी आहे असा विश्वास वाटला, थांबलोच आहोत तर थोडी खादाडी करु असा विचार करुन थोडा खाउ संपवला,व पुन्हा सुरु झालो, मस्त रस्ता व उतारच उतार, ब्रेक मारुन ही न ऐकणारा उतार होता . कोंढे गवळवाडी आली. दुकान दिसले व दोन रस्ते ही. एका रस्त्याने काही किमी वाचणार होते तर दुसरा खात्रीचा व राहुलच्या परिचयाचा होता . एकमत होत नव्हते , कोणता निवडायचा यावर चर्चा झाली . दुकानदाराच्या मते दुसरा निवडावा असे होते. मग छापा काटा केला, काटा आला तर शॉर्ट कट असे ठरले. काटाच आला, निघालो ,रस्ता मस्तच होता. वाटेत एक बाईकस्वार भेटला. पूढे जाऊ नका, मोरीवर पाणी आहे, मागे फिरणे भाग होते. फिरलो. व आता भलत्याच रस्त्याने वाकवली गाठणे भाग पडले. आता हा रस्ता पाहुन मात्र अंगावरच काटा आला. जिद्दीने रस्ता पार केला. त्यातही बाईकस्वाराने एक सुकदर मार्गे शॉर्टकट सुचवला होता, पण कोणताही फलक नसल्याने दोघेही राजी नव्हतो त्या रस्त्याने जायला.

वाकवली रस्त्याला लागलो एकदाचे .खेड दापोली वाहतुक सुरु आहे हे पाहुन हायसे वाटले. जेवायला घरी जाऊ शकत नाही व रस्ता केव्हाही बंद होऊ शकेल तेव्हा इथेच थांबून काहीतरी खाऊया यावर एकमत झाले.

आता परिचयाचा रस्ता व उतारच उतार होता .

नारंगी नदीवरचे पूल अजुन पाण्याखाली गेले नव्हते तरीही वेळ न दवडता जुन्या दापोली नाक्याजवळ आलो तर, खेडकडे जायला आज उपलब्ध असलेल्या एकमेव मार्गावर ही मोठी रांग दिसली गाड्यांची. नेहमीचा रस्ता तर पाण्याखाली केव्हाच गेला होता. सायकली हातात घेऊन, वाट काढत काढत तर ट्राफिक जॅम च्या कारणापर्यंत पोहोचलो. खेडचे टिपिकल वैशिष्ट्य असलेले अनेक “बघे” हजर होते. द. मा. मिरासदारांच्या कथेतील ग्रामीण पात्रांच्या वर्णनाशी मिळते जुळते “बघे”. त्यातील एकाने हे बघा *आफ्रिकन सफारी* आलेत, असा खोचक इशारा केला माझ्याकडे पाहुन. हसू आले, आता याची ही थोडी गम्मत करावी म्हणून त्याला थोडी सणसणीत प्रतिक्रिया दिली. मग वरमला थोडासा. खरतर परिस्थिती धोकादायक होती, आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो, त्याच्या सहा इंच खालीच पूराचे पाणी होते, व मोठे वडाचे झाड पडल्यामुळे एकमेव सुरु असलेला रस्ता बंद होता.

tree

 

झाड बाजूला करायचे काम युद्ध पातळीवर सुरु होते, यांत्रीक करवत व जेसीबी च्या सहाय्याने. खेड चे नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर, आपल्या कर्मचार्यांसह जातीने हजर होते व सुचना देत होते. झाड बाजूला झाले व बघ्यांची एकच धांदल उडाली. आफ्रिकन सफारी वाला बघ्या माझ्या शेजारीच उभा होता. रस्ता ओलांडायची संधी आम्हालाच प्रथम मिळाली. वैभजीनी त्याही गडबडीत “आज कूठे होता दौरा” असे विचारत हस्तांदोलन केले दोघांशीही. आफ्रिकन बघ्या आता मात्र पूर्ण वरमला व त्याने त्या गर्दीतही झपाट्याने काढता पाय घेतला. चला आजच्या राईड ला नाव मिळवुन दिले याबद्दल त्या बघ्याचे मनातल्या मनात आभार मानत शेवटचा टप्पा गाठायला निघालो. इथेही घरी जाण्याचा नेहमीचा मार्ग पूराच्या पाण्यामुळे बंद होता. तसे जाता आले असते, पण अस्मि ची चाके त्यात बूडू नयेत थोडीही, असे वाटले व एक छोटासा वळसा घालून घरी पोहोचलो.

भटक्या खेडवाला* ०८ जुलै २०१८॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

*छायाचित्रे राहुल गुजराथी व भटक्या खेडवाला

This slideshow requires JavaScript.

 

तांत्रिक माहिती:

Panhalaje2018
१. मार्ग – खेड~नांदगाव~कर्जी~तुंबाड~बहिरवली~पन्हाळजे~भडवळे~दमामे~कात्रण~कोंढे~वाकवली~फुरुस~खेड
२. एकूण अंतर – अंदाजे १०० किमी
३. एकूण सायकलिंगचा वेळ – ६ तास
४. एकूण वेळ – १० तास ३० मिनिटे
५. एलिव्हेशन गेन – १७०८ मी.
६. समुद्रसपाटी पासून गाठलेली सर्वात उंच पातळी – २५४ मी.
७. सरासरी वेग – १३.९ किमी
८. सर्वात अधिक वेग – ४२.५ किमी

४५ अंश सेल्सिअस,सततचे चढ उतार, १०० किमी,व तीन सायकल वेडे

काही ना काही कारणाने सायकल विरह वाढत चाललाय खेडला आल्यापासून. त्यात एक सुखद घटना घडली. ऱाहूल व यश या दोन साथिदारानी आपण खेड सायकलिंग क्लब सुरु करुया असा प्रस्ताव ठेवला. ताबडतोब सहमती दिली. हूरुप आला थोडा.
सुरुवात तरी भव्यदिव्य करायची या हेतूने, यावेळी शतकी राईड करायची असे ठरवले.
राहुल व यश दोघांनी अजून पर्यंत शतकी राईड केली नव्हती, त्यामुळे त्यांच्या कलाने घ्यायचे व त्यात महाभयंकर ऊन, त्याची ही काळजी घेत,वेगाच्या मागे न लागता उद्दीष्ट साध्य करणे आवश्यक होते. शुक्रवारी संध्याकाळी तीघे ही भेटलो. वेळापत्रक, संभाव्य त्रास, घ्यावयाची काळजी या विषयी चर्चा केली.
रात्री भरपूर पाणी प्या व वेळेवर निघुया असे सांगून निरोप घेतला.
साडेपाच ला निघालो तेव्हा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता . दिव्याच्या प्रकाशातच राईड सुरु केली.
कूवे घाटीच्या सुरवातीला पहीला थांबा घेतला आता दिव्याची गरज नव्हती. दोघांचा उत्साह व वेग व लय पाहून, आजचे लक्ष नक्की गाठू शकू या बद्दल मनात विश्वास निर्माण झाला.
कुंभवे ते टाळसुरे दरम्यान चक्क धूके दिसले रस्त्याला व बाजूला,क्षणभर हा ५ मे आहे कि ५ फेब्रुवारी असा संभ्रम पडावा इतके .
फोटो चा मोह अनावर झाला . थांबलो , थोडा पूढे जातोय तो तीवराच्या फुलांचा उग्र गंध व पाठोपाठ एका झाडाखाली मस्त लाल पखरण दिसली . अस्मि ला तेथे उभी करुन मस्त फोटो काढला. आवडत्या रस्त्यांवरुन सायकलिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो . वाकवली ते दापोली हा आवडता रस्ता, दोन्ही बाजूला पुरातन वृक्ष व छान बागा, त्यातही डॉ मोकल यांच्या बागेसमोरुन जाणारा रस्ता तर खासच,कोकणची हिरवाई नजरेने पीत व वेगवेगळ्या सुगंधानी युक्त हवा श्वासांत भरुन घेता घेता दापोली आले कधी ते कळलेच नाही .
साडे सात ला यश, केळसकर नाक्यावर पोहोचला . वाटेत आलेला एक फोन घेउन मी ही दहा मिनीटात व माझ्या मागोमाग राहूल ही थडकला.
मस्त भूक लागली होती , सरळ हॉटेल वृंदावन गाठले. रस्सा ,तेल युक्त चमचमित पदार्थांचा मोह टाळून कांदे पोहे घेतले . एका डीश ने भागण्या सारखे नव्हते म्हणून अजुन एक डीश तीघांत संपवली. चहा घेउन व उमेश कडचे पान खायला येताना परत येउ असे ठरवून निघालो .
राहूल दापोलीत शिक्षणासाठी राहीला असल्याने वृंदावन व उमेश कडचे पान याच्या लुफ्त शी वाकिफ होता.
अजून पर्यंत आम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार राईड सुरु होती. बुरोंडी रस्त्याला वळलो व खरा कोकण झा फिल आला. तांबुस छटाधारी आंबे लटकत होते , मधुनच पिवळी व लाल काजू बोंडे डोकावत होती. आसपास दिसणारे गावकरी अंबा किंवा त्यासंबंधी कामकाजांमध्ये व्यग्र होते. एक आजोबा जमीनीवरुनच झेला चालवताना दिसले. डेख तुटल्यावर लगेच येणाऱ्या चिकाचा गंध माझ्या नाकाने बरोब्बर टिपला . मस्त उतार संपला करजगाव तामसतिर्थ आले , समुद्र दर्शन झाले.
सागर सावली ओलांडुन एक हलकीशी चढण लागते तेथून पुर्वी समुद्र छान दिसायचा. तेथे थांबून फोटो काढणार होतो पण आता तेथे बांधकाम सुरु आहे. एक चांगला थांबा आता खासगीमालमत्ता होणार.
भविष्यात हवा विकत घ्यावी लागेल अशी विधाने अधुन मधुन ऐकू येतात. कोकणातले वाढते पर्यटन हे हवा विकण्याचाच छुपा व्यवसाय आहे असे वाटू लागण्याइतपत पर्यटन बोकाळलय हल्ली. फोटो न काढताच निघालो.
बुरोंडी ची भली मोठी चढाई यश च्या पाठोपाठ शांतपणे पार केली व भगवान परशुरामाच्या भव्य पुतळ्याशी एका हरड्याच्या झाडाच्या सावलीत थांबलो.
शिक्षक लोकांचा एक समुह आला होता, “येथे पाहण्यासारखे काय आहे अजुन” असा प्रश्ण आला. ढ विद्यार्थ्या सारखे ” काही नाही” असे उत्तर देउन मोकळा झालो.
नजर नसेल , आवड नसेल तर असे प्रश्ण पडतात, असो .
ऱाहूल पोहचला. थोडी खादाडी करुन खराब झालेल्या रस्त्याने निघालो . ऊन्हाची जाणीव आता होउ लागली होती. आगोम चा शॉर्ट कट आला. दोघांची वाट बघत थांबलो. या रस्त्याने कोळथरे फक्त २.४ किमी दूर होते. पण रस्ता इतका खराब झाला आहे कि कधी नव्हे ती सायकल हातात घेउन काही अंतर जावे लागले. खराब रस्ता व जीवघेणे उतार संपले व कोळथरे गाव आले .
मस्त गाव आहे .. माणसांच्या कैक पट झाडे आहेत गावात. नातेवाईकांच्या घराशी पोहोचलो. छान स्वागत झाले. आधी आम्ही कोणी पर्यटकच आहोत असे वाटले त्याना . काही दिवसांपूर्वी काही फ्रांस चे सायकलिस्ट इथे येउन गेल्याचे कळले. जेवणाचा आग्रह मोडुन काढत, सरबत , तळलेले गरे व मुख्य म्हणजे थंड पाणी भरुन घेउन निरोप घेतला. कोळेश्वराला बाहेरुनच नमस्कार करुन पंचनदी गावात आलो .
मंदिराच्या परिसरात पुर्वी लाल रंगाच्या अगस्ती (हदगा ) झाड होते. ते काही आढळले नाही. पण पांढरा अगस्ती फूले व शेंगा मिरवत उभा होता .
एक शेंग काढली. बघू होते का एखादे झाड . बऱ्याच वर्षात याच्या फुलांची भाजी खाल्ली नाही . बघू केव्हा योग येतो ते . नदीवरचा पूल ओलांडताना थांबुन, यश व राहूल ने काही फोटो काढले .एकाच गाईच्या पाठीवर अनेक गाय बगळे बसले होते . नदीत डुंबायचा मोह आवरुन पुढे निघालो.
आता चढ , चढ व फक्त चढ … त्यात तळपू लागलेला सुर्य देव व संपावर गेलेला वारा. यश मात्र मस्त सुरु होता . ऱाहुल मागे पडतोय हे लक्षात आल्यावर,मी थांबुन त्याची चौकशी करुन मग पुढे जाउ लागलो. अर्थात राहुल चा उत्साह कमी झालेला नव्हता फक्त श्रम मात्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण त्याच बरोबर निर्धार ही दिसत होता.
या राईड चा बेत ठरवतानाच, कोळथरे ते दापोली (दाभोळ जालगाव मार्गे) हा टप्पा सर्वात खडतर असणार याची खूणगाठ मनाशी बांधली होती .
दोन्ही भीडुंचा कस इथेच लागणार होता . व काळजी ही इथेच घ्यावी लागणार होती .
एक तर ऊन्हाची वेळ , जवळपास ४५ अंश तापमान (रस्तावरचे ) चढणाचा रस्ता , आधीच्या ५० किमी चा थोडासा थकवा अशा सर्व व्यस्त बाजू होत्या, त्यात वारा ही संपावर.
तारेचा खांब आला . थोडी विश्रांती घेतली. खादाडीही केली. आता वाऱ्याचा संप मिटल्याची बातमी घेउन एक हलकी झूळुक आली . चला एक अडथळा दूर झाला .
रस्ता ही तुलनेने बरा आला. एक चढाई पार करुन शेजारी शेजारी असलेल्या दोन अंब्यांच्या सावलीत मस्त जमिनीवरच फतकल मारुन बसलो. आता तहान भूक व थकवा हे सर्व जाणवत होते. या अंतरासाठी जास्त वेळ वेळापत्रकात ठेवला होता. त्यामुळे घाई न करता दोघांच्या कलाने पूढे जात राहीलो.
उंबर्ले गाव मागे टाकून एका मार्ग निवारा शेड मध्ये थांबलो. बराच वेळ झाला तरी दोघे ही दिसेनात. ऱस्त्याने येणाऱ्या दुचाकी स्वाराना थांबवुन विचारले खूणेनेच .. हो येताहेत मागुन असे समजताच काळजी मिटली. दहा मिनीटे गेली तरी दिसेनात. परत स्कुटर वाल्याला विचारले रस्त्यावर येउन ,त्याने ही येताहेत असेच सांगीतले. दोघे आल्यावर खुलासा झाला. जवळचे पाणी संपल्यामुळे , बाटलीबंद पाण्याच्या शोधात वेळ गेला दोघांचाही. मस्त थंड पाणी घेउन आले होते , थोडे पाणी पिउन निघालो. आता जालगांव दीड दोन किमी च राहीले होते . भूक अशी लागली होती कि , जर जालगांवात चांगले जेवण मिळाले तर तेथेच जेवूया असा बदल केला कार्यक्रमात. ऱस्त्यावर वितळलेल्या डांबरावरुन जाताना येणारा चर्र चर्ऱ असा आवाज माझ्या ही मनाला चटके देत होता ,बिच्चारी अस्मि, हूं कि चूं न करता पळत होती.
एक छोटेसे पण स्वच्छ उपाहारगृह दिसले. सायकली सावलीत लावल्या.
आपापल्या आवडीचे मेन्यू निवडुन मस्त तुटुन पडलो जेवणावर. जेवणाआधी सोलकढी मात्र आवर्जून प्यायलो. पित्त प्रकोप व्हायला नको, कारण पित्त प्रकृती नसलेल्या व्यक्तीलाही त्रास होइल अशा हवेतुन सत्तर किमी चा सायकल प्रवास झाला होता.
जेवणानंतर कोठेतरी थांबायचे थोडावेळ असे ठरवले होते. योग्य ठिकाण मिळेना,मग मोर्चा दापोलीकडे वळवला व उमेश च्या दुकानाशी जाउन थांबलो. हेल्मेट काढल्यावर उमेश ने दोघानाही ओळखले .
मस्त पान चमकवले व एक बांधुन घेतले.
दापोलीतल्या साने गुरुजी उद्यानात विश्रांतीसाठी थांबलो. सायकली गेट बाहेर लावण्याच्या बोलीवर आत प्रवेश मिळाला. ऱखवालदाराने एक नोंद वही पूढे केली. नाव गाव पत्ता कुठून कूठे निघालात याची नोंद करायला सांगीतले. उद्यान छान राखलेले आहे. खेड च्या उद्यानांची गत व अवकळा आठवुन उदास झालो. मग एकंदरच खेड च्या सांस्कृतिक दर्जाविषयी थोड्या गप्पा झाल्या. दापोली, गुहागर, चिपळूण हे तालुके सांस्कृतिक दृष्टीने खेड पेक्षा समृध्द आहेत. असो ..
आता तीघेही ताजेतवाने झालो होतो.
व शेवटचा व बराचसा उताराचा टप्पा शिल्लक होता .
यश तर सुसाटच सुटला होता .
खरतर न थांबताच हा २७ किमीचा टप्पा मारायच्या विचारात होतो, पण चिंचघर जवळ दोन मूलांनी हात दाखवून व ओरडुन थांबायचा आग्रह केला, म्हणून थांबलो. त्यांचे शंका निरसन करुन निघालो, नारंगी नदीच्या किनारी एका वडाच्या झाडाखाली तीघे ही भेटलो. तेथून निघालो ते थेट कन्याशाळा खेड या आमच्या सुरवातीच्या ठिकाणाशी येउन थांबलो .
यश व राहुल च्या चेहऱ्यावर पहील्या वहील्या शतकी राईड चा आनंद सामावत नव्हता.
मी ही दीर्घ विरहा नंतर आज शतक मारले होते.
पावसाळी सायकलिंग चे बेत आखले, फक्त खेड दापोली खेड राईड ही करायच्या असे ठरवले .
थकल्या शरीराने पण उत्साहभारीत मनाने घरी परतलो.
माझ्या शतकी भागीदारीतील सहकार्यांच्या संख्येत आज एकदम दोनाची भर पडली.
जगायचं असेल आनंदाने ,तर असे एखादे वेड असावे. मग ते एखाद्या छंदाचे असो वा कलेचे वा साहित्याचे.तसं नसेल तर आपणच फक्त शहाणे व बाकि जग येडं दिसतं.
असे एखादे वेड असेल तर आयुष्य समृद्ध होतं
नाहीतर मग गदिमा म्हणतात त्या प्रमाणे
उंबरातील किडे मकोडे ………
भटक्या खेडवाला (०६ मे २०१८)

२०१८ ची पहीली पावसाळी राईड

गेल्या वर्षीचा पावसाळा भन्नाट गेला होता.
जवळपास प्रत्येक सुटीला पुर्ण भिजत राईड केल्या होत्या, अंबरनाथ च्या आसपास.
पूढच्या पावसात कोकणात असणार हे तेव्हाच माहीत होते. तेव्हापासूनच वाट पहात होतो, आज योग आला. गेल्यापावसात कोणी ना कोणी साथिदार मिळत असत, खेड ला मात्र साथिदारांचा दुष्काळ असणार या विचाराने मन खट्टू व्हायचे पण तो ही प्रश्ण सुटला, दोन ताज्या दमाचे साथिदार मिळाले,आता फक्त प्रतिक्षा होती पावसाची.
“९ ते १२ जुन मुसळधार पाऊस पडणार आहे ,नागरिकांना सावध करण्यात येते कि अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा” असे आवाहन गेले दोन तीन दिवस खेड नगरपालिका करत होती.
त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून , व त्यातल्या अत्यावश्यक या शब्दाची खास दखल घेउन आजच्या राईड चा बेत ठरवला .
०५ मे च्या भर उन्हातल्या शतकि राईड नंतर एकदाही सायकलिंग ची संधी मिळाली नव्हती. कधी कार्यालयीन कामे, तर कधी मे महिन्यातली पाहूणे मंडळी, तर कधी नात्यातले आवश्यक कार्यक्रम ,अशा अनेक कारणानी राईड होत नव्हती .
त्यामुळे आज राईड करणे अत्यावश्यकच होते.
खेड सायकलिंग क्लब चे सर्व सक्रिय सदस्य म्हणजे इन बिन तीन जण नक्की राईड करणार होतो.
पाऊस असल्याने थोडे उशीरा निघाले तरी चालेल यावर एकमत झाले, म्हणून साडेसहा ही वेळ ठरवली, पण ती पाळण्यात एक सदस्य आज चुकला. नीघे पर्यंत सात वाजले. असो.दापोली रस्त्यावर असलेल्या अनेक ऱायवळ आंब्यांच्या झाडांखाली सडा पडला होता. एक नुकताच पडलेला पिवळा धम्मक आंबा उचलुन पाउच मध्ये ठेवला,पहील्या थांब्यावर त्याचा समाचार घेण्यासाठी.
फक्त आंबेच नाही तर जांभळे,कुंभा, फणस अशी फळे धारातीर्थी पडली होती.
अजिबात प्रक्रिया न केलेले अन्न खाउन एखादि राईड करता येइल का असा विचार आला मनात. या रस्त्याला या दिवसात हे शक्य आहे. बघू कधी योग येतो ते.
दापोलीत पोहोचलो तेव्हा साडे आठ झाले होते. हवा कुंद पण पावसाचा पत्ता नाही. वृंदावन ला भरपेट नाष्टा करुन सुसाट उताराने आसुद ला आलो तरी पाउस नाहीच ..
हवामान खात्याचे सर्व अंदाज एकाबाजूला व ट्रेकर्स सायकलिस्ट लोकांचे अंदाज एकाबाजुला ठेवले तर ट्रेकर्स सायकलिस्ट चे अंदाज जास्त अचुक ठरतात असा अनुभव आहे . त्याचा प्रत्यय आज ही आला.
“आपल्याला पाउस मिळाला तर फक्त परतीच्या प्रवासातच मिळणार” असे दोन्ही साथिदाराना सांगीतले .
हर्णे गावात तर एक स्त्री घराच्या कौलांवर चक्क कपडे वाळत घालत होती. जणू काही हवामान खात्याची लक्तरेच वेशीवर टांगत आहे असा भास झाला मला. अर्थात तंत्रज्ञानात झालेल्या संशोधनामुळे खूपच योग्य अनुमान काढता येते आजकाल पावसाचे . भली थोरली चढण व उतार ,खाडीपुल ओलांडुन आंजर्ले गावात शिरलो,कड्यावरच्या गणपतीला लांबुनच नमस्कार केला .समुद्राकडे जायचा रस्ता विचारत विचारत किनारा गाठला.दोन्ही बाजूला नारळी ,पोफळी व केळी च्या बागा, शांत निवांत परिसर , शुद्ध हवा, अशा रस्त्यांवरून सायकल सारखे पर्यावरण स्नेही व आरोग्य देणारे वाहन चालवणे म्हणजे खरे निसर्गाशी साहचर्य. अशा साहचर्याचा आनंद काही वेगळाच, शब्द बंबाळ वर्णनानी त्याची अनुभूती येणे कठीण आहे, अनुभव स्वतः घेतला तरच त्याची महती कळते.

करड्या रंगाचे साम्राज्य होते आज सागर किनाऱ्यावर. फक्त एक मोठे कुटुंब सागरस्नानाचा आनंद घेत होते, व एक तरुणांचा समुह वाळूवर क्रिकेट खेळत होता. त्याना त्रास होणार नाही इतके अंतर ठेउन तीन्ही सायकली पाण्यात शिरल्या . मस्त फोटो, व्हिडिओ झाले. तीन चार चकरा मारुन पुन्हा रस्त्यावर आलो.

This slideshow requires JavaScript.

गोड्या पाण्याची व स्नान गृहाची सोय या किनाऱ्यावर आहे . त्याचा लाभ घेउन,परतीच्या मार्गाला लागलो. अजुन पावसाचा पत्ता नव्हता. आता हर्णे बंदराचा मार्ग न घेता घाट रस्त्याने जायचे असे राहुल ने ठरवले होते, ह्या राईड चा सर्व बेत ,मार्ग राहुलनेच ठरवला होता. मस्त चढाई, वळणे व अप्रतिम नजारा असलेल्या रस्त्याने वर आलो . आता हवा फिदा होती. या रस्त्यावरच्या प्रसिद्ध थांब्यावर थांबलो. खाली हर्णे गाव, समुद्र छान दिसत होते.


एखाद्या महान गायकाच्या मैफिली आधी जशी बरीच जुळवाजुळव सुरु असते तशीच तयारी पावसाने सुरु केली होती. सरळ सपाट रस्त्यावरुन समोर पाउस दिसु लागला व तिघेही रोमांचित झालो. आला आला म्हणता म्हणता पुर्ण न्हाउन निघालो. मैफिलीत सुरानी श्रोते नाहतात तसे इथे पाण्याने इतकाच फरक. श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहुन जसा गायक रंगात येतो, तसाच आम्हाला आनंदित झालेले पाहुन पाउस ही बरसु लागला. यश ची ही पहिलीच पावसाळी राइड, त्यात आमच्यात हा सर्वात तरुण, मस्त मजा लुटली यश ने.
परतीच्या मार्गावर आसुद चे सुप्रसिद्ध हॉटेल समाधान येथे अस्सल भाजणीचे थालीपीठ व फक्कड चहा घेण्यासाठी थांबलो. आम्ही पुर्ण भिजलो होतो, त्यामुळे बाकांवर बसुन चालेल का अशी विचारणा केली, हसत हसत परवानगी मिळाली मगच आत शिरलो. पुढच्या चढाई आधी ही पोटपुजा आवश्यकच होती.
दापोली जवळ आली तेव्हा यश च्या सायकल च्या ब्रेक चे थोडे काम निघाले. तिघांच्या संयुक्त प्रयत्नाने ते पुर्ण करुन पुन्हा वृंदावन ला आलो. आता पाउस दमदार बरसत होता. इथेही मालकांना विनंती करुन खुर्च्यांवरच्या उशा काढुन ठेवायला सांगुन मगच बसलो.
मस्त सामिष अन्नाचा समाचार घेतला. उमेश कडचे पान तोंडात घोळवत घोळवत दापोली ते खेड हे २७ किमी चे अंतर, न थांबता पार केले. या अंतरात पाउस ही सतत सोबतीला होता.
जांभळाच्या झाडाखालील सड्या मधुन येणाऱ्या आंबुस गंधा मधुन येणारीएक छटा, संध्याकाळी हवी हवीशी वाटणाऱ्या गंधाच्या छटेशी मिळती जुळती होती. तो एक क्षण वगळता, पाउस रस्ता सायकल या त्रयीशी पूर्ण एकरुप झालो होतो.
अत्ता हा लेख लिहिताना इथे पाउस मस्त कोसळतोय पण आज मात्र सायकलिंगचा ड्राय डे साजरा करणार आहे.
~भटक्या खेड वाला (१० जून २०१८)

तांत्रिक माहिती:
१. मार्ग – खेड~दापोली~आसुद~हर्णै~मुर्डी~आंजर्ले व याच मार्गाने परत खेड
२. एकूण अंतर – १०३.२ किमी
३. एकूण सायकलिंगचा वेळ – ७ तास ३९ मिनिटे
४. एकूण वेळ – १० तास ३० मिनिटे
५. एलिव्हेशन गेन – १६२९ मी.
६. समुद्रसपाटी पासून गाठलेली सर्वात उंच पातळी – १९३ मी.
७. सरासरी वेग – १३.५ किमी
८. सर्वात अधिक वेग – ४७.९ किमी